गंगापूर, (प्रतिनिधी): गंगापूर येथील न्यू मॉडेल एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी, औरंगाबाद संचलित तुराबुल हक उर्दू प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक फैसल चाऊस, नगरसेवक सय्यद अख्तर, अनिस कुरेशी, संपादक अलिम चाऊस, नवाज सय्यद, नदिम बागवान, सलीम खान आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेऊन उच्च ध्येय निश्चित करण्याचे आणि सातत्याने परिश्रम करण्याचे आवाहन केले.
शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडवावे. शिक्षण हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासोबतच राष्ट्राच्या प्रगतीचे प्रभावी साधन असल्याचे मान्यवरांनी मनोगतात सांगितले. कार्यक्रमास पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. विद्यालयाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक इम्रान पठाण, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.












